गोवा : शिवसेना पक्ष हा भाजपच्या नोटांना पुरून उरणारा पक्ष आहे. तुम्ही कितीही नोटा टाका तुमच्या नोटांशी आम्ही लढू आणि जिंकू असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र्रात देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यात नेहमीच वाकयुद्ध सुरु असते. देवेंद्र फडणवीस हे गोवा भाजपचे प्रभारी आहेत तर संजय राऊत हे शिवसेनेचे गोवा संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे महाराष्ट्र्रातील हे दोन्ही नेते गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमनेसामने आले आहेत.


महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.


शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा कुठे किती आणि कशा जातात हा प्रकार मला माहित आहे. त्यामुळे  तुम्ही कितीही नोटा टाका. आम्ही त्याविरोधात लढू आणि जिंकू असे राऊत म्हणाले.    


काही ओपिनियन पोलनुसार उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येईल असे म्हटले जात आहे. पण, सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार पक्ष सोडत नाहीत. मात्र, इथे परिस्थिती असून उत्तरप्रदेश आणि गोव्याचा राजकीय प्रवास परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 


देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आणि ते गोव्यात गेल्याबरोबर भारतीय जनता पक्षही फुटला. मंत्री, आमदार यांनी पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत सुरू असलेली लढाई लढावी. नंतर सरकार येणार असल्याचा दावा करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.