...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही
यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.
नवी दिल्ली : यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार जर पती पत्नींमध्ये परस्पर सामंज्यास्यानं घटस्फोट होणार असेल आणि पोटगी तसचं मुलांच्या संगोपनाविषयीही समझौता झालेला असेल, तर घटस्फोटासाठी सहा महिने वाट बघण्याची गरज नाही.
कायद्यातील सहा महिन्यांच्या तरतूदीनं जर दोघांचा मनस्ताप वाढणार असेल, तर ही तरतूद शिथील करण्याचा अधिकार संबंधित न्यायालयास आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
दोन्ही बाजूंच्या जवळच्या नातेवाईंकांनी कोर्टाबाहेर केलेले सलोख्याचे प्रयत्न अयशस्वी झाले, पती-पत्नी विभक्त होण्यास तयार असतील, मुलांच्या संगोपनाविषयी कुठलेही मतभेद नसतील, आणि पोटगीचाही प्रश्न सुटलेला असेल, तर सहा महिन्याचा कालावधी अत्यंत क्लेशदायक ठरतो. शिवाय दोघांनाही नव्यानं आयुष्य सुरू करायला उगाच उशीर होतो. अशा परिस्थितीत न्यायालायनं हिंदू विवाह कायद्यातली कलम १३ ब शिथील करावं असं न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती ए के गोयल यांनी निकाल पत्रात म्हटलंय.