त्यांचा मुख्यमंत्री नाहीच नाही, तोपर्यत भाजप राहील का?
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका करताना भाजपच्या आडमुठेपणामुळे नातं संपलं आहे, असं विधान केलं आहे.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून शिवसेनाही प्रचारात जोमाने उतरली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपवर टीका करणं हा सर्व विरोधी पक्षाचा सध्या अजेंडा आहे. यात शिवसेना आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.
पुष्पा सिनेमातला ‘झुकेंगे नही’ हा डायलॉग शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. तो आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा नारा आहे. कशाला झुकायचं? आणि का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असतील पण आम्ही लढू.
मात्र, 2024 मध्ये लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. त्यांनी आता महाराष्ट्राला विसरावं. निवडणुकीपर्यत भाजप राहिल की नाही हे ठाऊक नाही परंतु, महाविकास आघाडी महाराष्ट्राचे भविष्य आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
भाजप आणि युतीची चर्चा आता होऊ शकत नाही. आम्ही थोडंफार एकत्र नांदलो. परंतु, त्यांच्या आडमुठेपणामुळे सगळं संपलं आहे. त्यामुळे युतीची कसलीही आणि कुणाशीही चर्चा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जे वैफल्य ग्रस्त होऊन निराश मनाने राजकारण करतात. त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजप जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटन, अगदी व्हाईट हाऊसमध्येही त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण, महाराष्ट्रात त्यांच्या पदरी निराशाच येईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.