नवी दिल्ली: अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमी खटल्याच्या सुनावणीला सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिर हे एखाद्या अटळ सत्याप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याप्रमाणे काबा, सुर्वण मंदिर आणि व्हॅटकिन सिटीची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तसेच रामजन्मभूमीचे ठिकाण बदलणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण राम मंदिर हे एक अटळ सत्य आहे, अशी भावना इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली. 


रामजन्मभूमी-बाबरी वादाची नियमित सुनावणी २९ ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार सोमवारी या खटल्याची पहिली सुनावणी होणार आहे. यावेळी खटल्याच्या पुढच्या तारखा निश्चित केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.