नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ४,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले आहेत. भारतामध्ये लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. वाढत्या तापमानामध्ये कोरोना जिवंत राहू शकत नाही, असं बोललं जात होतं. पण उन्हामुळे कोरोना मरतो, हे सिद्ध करणारा कोणताही अभ्यास झालेला नाही किंवा तसे पुरावेही नाहीत, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस दूर ठेवणं कठीण आहे. कोरोनावर लस तयार करायला निदान एक ते दीड वर्ष लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातल्या ३० विमानतळांवर १०.५ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसंच दीड हजार जणं निरिक्षणाखाली आहे, असंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.




भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या टेस्ट करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. भारत जागतिक आरोग्य संघटनेशी सुसंवाद ठेवून आहे, असं आश्वासन आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे.




दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. घाबरून जाऊ नका, योग्य ती काळजी घ्या, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. केंद्र सरकारचा कोणताच मंत्री नजीकच्या काळात परदेशात जाणार नाही. भारतीयांनीही गरज नसताना परदेशी जाऊ नये, असं मोदी म्हणाले आहेत. मोठ्या प्रमाणातले सार्वजनिक कार्यक्रम टाळून आपण कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतो, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हणलं आहे.