नोएडात `सैराट` : घरच्यांचा विरोध डावलणाऱ्या प्रेमी युगुलाची हत्या
घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.
नई दिल्ली : घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ग्रेटर नोएडा येथील मायचा गावच्या रेल्वे ट्रॅकवर त्यांच्या शरीराचे तुकडे सापडले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. घनिष्ठ प्रेमाचे लग्नात रुपांतर करु इच्छिणाऱ्या अंकित आणि शालू या युगुलाला आपला जीव गमवावा लागला.
लुहारली गावात राहणारा २२ वर्षीय अंकित आणि त्यांच्या सोबत शिक्षण घेत असणारी २० वर्षीय शालू धावण्याच्या सरावासाठी रोज मैदानवर जात असत. धावण्याच्या सरावा दरम्यानच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनाही उत्तम धावपटू बनायचे होते. तसेच दोघांनी मिळून चांगल्या आयुष्याची स्वप्न देखील पाहिली होती. पण घरच्यांचा मात्र या प्रेमाला विरोध होता. दोघांनीही एकमेकांना भेटू नये, एकमेकांशी बोलू नये अशी ताकीद घरची मंडळी त्यांना देत असतं. घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दोघांनी एकत्र राहण्याचा निर्धारच केला होता. मंगवारी दोघे धावण्याच्या सरावाला मैदानवर गेले मात्र घरी परत येऊ शकले नाही.
शालू घरी न आल्याने तिच्या घरच्यांची चिंता वाढली आणि त्यांनी अंकितचे घर गाठले. तुमच्या मुलाने आमच्या मुलीला पळून नेले असा आरोप शालूच्या घरच्यांनी त्यांच्यावर लावला. पण यावेळी अंकितच्या घरच्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. काही वाईट झाल नसणार आणि आम्ही अंकितला समजावून सांगु असे ते म्हणाले.अंकितच्या घरचेही रात्रभर अंकितला शोधत होते मात्र अंकित कुठेच सापडला नाही. बुधवारी सकाळी ग्रेटर नोएडा मायचा गाव जवळील रेल्वे ट्रॅकवर दोघांचे मृत शरीर कापलेल्या अवस्थेत आढळले. घाबरलेल्या स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांत माहिती दिली होती. घटनास्थळी लोकांची खुप गर्दी जमा झाली आणि सुचना मिळाल्याबरोबर पोलिसही तिथे पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनांसाठी पाठवले आहेत. अंकितच्या ओळखीमधील लोकांनी त्यांची हत्या केली असावी असा आरोप शालूच्या घरच्यांनी लावला आहे. तर शालूच्या घरच्यांनी दोघांची हत्या केली असावी असा आरोप अंकितच्या घरच्यांनी केला. दरम्यान पोलिसांनी दोघांचीही तक्रार नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनांसाठी पाठविले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर यामागचे सत्य कळणार आहे.