नवी दिल्ली: गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षाला काँग्रेसने गमावलेला जनाधार पुन्हा कमावता येणार नाही, असे मत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले. ते 'द इंडियन एक्स्प्रेस' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी अधिर रंजन चौधरी यांनी काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांकडून सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रासंदर्भात भाष्य केले. काँग्रेसचे सध्याचे अपयश ही सामूहिक जबाबदारी आहे. त्याची जबाबदारी एकट्या सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर ढकलता येणार नाही, असे चौधरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

तसेच गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करून काँग्रेससमोरील समस्या सुटणार नाहीत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. चौधरी यांनी म्हटले की, काँग्रेसच्या गांधी घराण्याबाहेरील व्यक्तींनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविले आहे. पी.व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी ही अलीकडची उदाहरणे आहेत. मात्र, प्रत्यक्षात गांधी घराण्याबाहेरील कोणत्याच अध्यक्षाला आपल्या कारकीर्दीत कोणतेही नेत्रदीपक यश मिळवता आले नाही. हीच खरी समस्या आहे. नरसिंह राव यांच्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाईपर्यंत काँग्रेसला कधीच आपला गमावलेला जनाधार मिळवता आला नव्हता. आपण या सत्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय पक्षाला यश मिळू शकत नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, असे अधिर रंजन चौधरी यांनी सांगितले. 


२३ काँग्रेस नेत्यांचा लेटर बॉम्ब, पाहा काय आहे सोनियांना लिहिलेल्या पत्रात


तसेच अधिर रंजन चौधरी यांनी पत्रप्रपंच करणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण सहमत नसल्याचे सांगितले. कारण, काँग्रेसचे अपयश हे सामूहिक आहे. काँग्रेसमधील काही नेते या अपयशाचे खापर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर फोडू पाहत आहेत. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे भाजपच्या दाव्याला अधिक बळ मिळत आहे. हे नेते भाजपच्या हातात आयते कोलीत देत आहेत. सोनिया गांधी यांच्यात क्षमता आहे. त्या राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे अधिर रंजन चौधरी यांनी सांगितले.