नवी दिल्ली: अर्थशास्त्र हा माझा पेशा आहे आणि त्यामध्ये मी पक्षपात करत नाही, अशा शब्दांत नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक मिळाले, हे ठीक आहे. पण ते डाव्या विचारसरणीचे असल्याची खोचक टीका गोयल यांनी केली होती. मात्र, गोयल यांचे हे वक्तव्य माझ्या व्यावसायिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. अर्थशास्त्रीय विचार करताना मी कधीही पक्षपात करत नाही, असेही त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझा पेशा आणि व्यावसायिकपणावर शंका उपस्थित करणाऱ्या गोयल यांच्या विधानाला फारसा अर्थ नाही. कारण, आमच्या व्यावसायिक वृत्तीमुळेच आम्हाला नोबेल पारितोषिक देण्यात आले. वैयक्तिक जीवनात मी अनेक गोष्टींविषयी पक्षपाती असेन. पण अर्थशास्त्राबाबत मी लोकांना गांभीर्याने सांगू इच्छितो की, मी किंचितही पक्षपाती नाही. कोणी मला प्रश्न विचारला तर मी त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत नाही, असे बॅनर्जी यांनी म्हटले. 


नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीत बॅनर्जी यांनी सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया डळमळीत झाल्याचे मत व्यक्त केले होते. 


याविषयी पत्रकारपरिषदेत विचारणा झाली असता गोयल यांनी म्हटले होते की, अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक मिळाले, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, त्यांची समज कितपत आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांची विचारसरणी ही पूर्णपणे डावीकडे झुकलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या 'न्याय' योजनेची भलामण केली होती. मात्र, भारताच्या जनतेने त्यांचा हा विचार सपशेल नाकारला होता, असे गोयल यांनी म्हटले होते.


मात्र, त्यावेळी भाजपने मला विचारले असते तर मी त्यांनाही हीच आर्थिक माहिती दिली असती, असे बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण गुजरात प्रदूषण महामंडळासोबत काम केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तेथील अधिकारी प्रत्यक्ष पुरावे प्रमाण मानून काम करणारे असल्याने माझ्यासाठी तो अनुभव खूपच चांगला होता, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.