नवी दिल्ली: घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने किंमतीत घट करण्यात आली आहे.  वर्षाला १२ अनुदानित सिलेंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो. मात्र, ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे या नव्या दरांमुळे १४.२ किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता ५७४.५० रुपये इतका असणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच हा नवा दर लागू झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे.


गेल्या महिन्यात सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात १००.५० रुपयांनी मोठी कपात करण्यात केली होती. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी ६२.५० रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यांत गॅसचे दर हे १६३ रुपयांनी कमी झाले आहेत. 


त्यामुळे हा गृहिणींसाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती सिलेंडरच्या नव्या दराप्रमाणे प्रत्येक सिलेंडरसाठी ग्राहकाला आपल्या बँक खात्यात १४२.६५ रुपयांचे अनुदान मिळेल. वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात. 


गेल्या महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत १००.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. १ जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते.