सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय व्हीडिओ गेम वाटला का? मोदींचा काँग्रेसला टोला
एसी रुममध्ये बसून कागदावर सर्जिकल स्ट्राइक करण्याचे काम काँग्रेसलाच जमू शकते.
जयपूर: काँग्रेस सध्या ज्याप्रकारे सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करत आहे त्यावरून निवडणुका संपेपर्यंत ते आम्ही ६०० सर्जिकल स्ट्राईक केले, असे सांगतही फिरतील. काँग्रेसमधील काही जणांचे व्हीडिओ गेम खेळायचे वय अजूनही सरलेले नाही. त्यामुळे त्यांना सर्जिकल स्ट्राईकही एखाद्या व्हीडिओ गेमसारखाच वाटत असेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. ते शुक्रवारी राजस्थानच्या सिकर येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेसकडून सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात करण्यात येत असलेल्या दाव्याची खिल्ली उडविली. त्यांनी म्हटले की, काँग्रेस आता आमच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे सांगत आहे. त्याच्या तारखाही काँग्रेसने जाहीर केल्या आहेत. मात्र, या सर्जिकल स्ट्राईकची माहिती लष्कराला नाही, दहशतवाद्यांनाही नाही, पाकिस्तानलाही नाही, एवढेच काय भारतामधील लोकांनाही नाही. त्यावेळी सर्जिकल स्ट्राईक हा शब्द तरी कोणाच्या कानावर पडला होता का, असा सवाल मोदींनी विचारला.
सुरुवातीला आम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्याचे जाहीर केले तेव्हा काँग्रेसने सर्वप्रथम आमची खिल्ली उडविली. मग जनतेचा वाढता पाठिंबा पाहून त्याला विरोधही करून पाहिला. यानंतरही लोकांना सरकारचा उदो उदो केल्यानंतर आता काँग्रेस आम्हीदेखील सर्जिकल स्ट्राईक केले, असे सांगायला लागला आहे. एसी रुममध्ये बसून कागदावर सर्जिकल स्ट्राइक करण्याचे काम काँग्रेसलाच जमू शकते. मात्र, कागदावर आणि व्हीडिओ गेममध्येच सर्जिकल स्ट्राईक करायचे असतील तर मग सहा असोत किंवा तीन, २० असोत किंवा २५, असे खोटे दावे करणाऱ्यांना फरक पडत नाही, असे मोदींनी सांगितले.