पाटणा: मी नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बिलकूल घाबरत नाही, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते शनिवारी बिहारमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राहुल यांनी म्हटले की, तरुणांमधील बेरोजगारीमुळे पंतप्रधान मोदी देशात द्वेष पसरवत आहेत. त्यांनी पाच वर्षे 'मन की बात' हा फ्लॉप शो चालवला. पाच वर्षे हाच शो पाहून लोकही कंटाळलेत. आता भाजप सरकार बदलण्याची वेळ आली आहे, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी सर्वप्रथम मला पंतप्रधान करा, असे सांगितले. मी पंतप्रधान झाल्यावर तुम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आता ते आम्ही सर्व चौकीदार असल्याचे म्हणतात. चौकीदार हा गरिबांच्या घरात असतो की श्रीमंतांच्या घरात? मोदी चौकीदार आहेत, हे नक्की, पण ते गरिबांचे नव्हे तर अंबानी यांच्यासरख्या श्रीमंत लोकांचे चौकीदार आहेत, असेही राहुल यांनी म्हटले. 




जेव्हा तुमचे पंतप्रधान भेटायला येतील तेव्हा विचारा की तुम्ही १५ लाखांसंदर्भात लोकांची फसवणूक का केली? दोन कोटी रोजगारांचं खोटे आश्वासन का दिले? जोपर्यंत तुम्ही तुमच्या हक्कांविषयी आवाज उठवणार नाही, तोपर्यंत काही बदलणार नाही, असेही यावेळी राहुल यांनी सांगितले.