मुंबई : भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे. ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा आली तर आता ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांनाही त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. याआधी ही सुविधा फक्त तिकीट खिडकीवरून तिकीट काढणाऱ्यांनाच मिळत होती. ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांसाठीच्या नियमांमध्ये रेल्वेकडून बदल करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनला तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यावर प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट रद्द केलं तर तिकीटाचे अर्धे पैसे प्रवाशांना लगेचच परत मिळणार आहेत. उरलेली ५० टक्के रक्कम प्रवाशाच्या प्रवासाची माहिती मिळाल्यावर मिळेल. ई-तिकीटचे पैसे परत मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या टीडीआर ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे.


टीडीआर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर प्रवाशाला त्याच्या तिकीटाचा पीएनआर नंबर आणि यात्रेबद्दलची अन्य माहितीचा फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यावर बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज प्रवाशाला मोबाईलवर येईल. तसंच तुमच्या रजिस्टर ई-मेल आयडीवरही याबाबतचा एक मेल येईल.


सगळ्या बँकांची कार्ड चालणार


ऑनलाईन तिकीट बूक करताना सगळ्या बँकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड चालणार आहेत, असं आयआरसीटीसीनं सांगितलं आहे. रेल्वे तिकीट बूक करताना आयसीआयसीआय, एसबीआय सारख्या ६ बँकांची कार्ड वापरता येणार नाहीत. तिकीट बूक करण्यासाठी इंडियन ओव्हरसिज बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, इंडियन बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक या बँकांची कार्ड चालतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आयआरसीटीसीनं स्पष्ट केलं आहे.