मुंबई : आता बातमी मेडिकल क्षेत्रातल्या एका महत्त्वाच्या संशोधनाची.  तुम्हाला जखम झाली किंवा एखादं मोठं ऑपरेशन झालं तर टाके घालावे लागतात किंवा स्टेपल करावं लागतं. मात्र यामुळे अनेकदा त्रास होतो. मात्र आता ही कटकट राहणार नाही. संशोधकांनी एक डिंक शोधलाय जो बेमालूमपणे जखमा चिकटवू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही बघताय ही कोणती जादू नाही आहे. कितीही खोल जखम असली, तरी त्यावर हा डिंक टाकायचा. अवघ्या एका मिनिटात जखम भरून निघेल. ना टाके ना स्टेपल. जखम शिवायची गरजच नाही. हा डिंकच फाटलेली कातडी आणि पेशी जोडून टाकतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक अली खादमहोसिनी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील बायोमेडिकल इंजिनियर्स आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठानं संयुक्तरित्या हे संशोधन केलं आहे. 



या बायोमेडिकल ग्लूला मेथाक्रिलॉईल सबस्टिट्यूटेड ट्रोपोएलास्टिन म्हणजेच 'मेट्रो' असं नाव देण्यात आलं आहे. इलास्टिक आणि अॅडेसिव्ह असलेला हा पदार्थ पेशींच्या मध्ये बेमालून मिसळतो. अल्ट्रा व्हॉयलेट लाईटच्या साहाय्यानं तो अॅक्टिव्हेट केल्यानंतर अवघ्या 60 सेकंदांत पेशींमध्ये विरघळतो आणि जखम भरून काढतो. याचा फॉर्म्युला गरजेनुसार बदलता येतो. म्हणजे एखादी जखम पूर्णपणे बरी व्हायला जितका वेळ लागणार आहे, त्यानुसार त्याची रचना करता येईल. 


काही सस्तन प्राणी आणि डुकरांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून लवकरच 'मेट्रो'ची मानवी चाचणी सुरू होणार आहे. आतापर्यंत अशा काही डिंकांवर संशोधन झालंय. मात्र हृदय किंवा फुफुसासारख्या आकुंचन-प्रसरण पावणाऱ्या पेशींसाठी ते उपयुक्त नव्हते. 'मेट्रो' हा बायोमेडिकल ग्लू मात्र त्या परिस्थितीतही पेशी घट्ट धरून ठेवत असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय पेशींमध्ये असलेल्या द्रव पदार्थांमध्ये तो विरघळत नाही. हे वैद्यकीय क्षेत्रातलं एक महत्त्वाचं संशोधन मानलं जातंय. केवळ किरकोळ जखमाच नव्हे, तर हृदय, फुफ्फुस, आतड्यांसारख्या व्हायटल ऑर्गन्सवरील नाजूक शस्त्रक्रीयांमध्येही हा ग्लू अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.