बेळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार असे अनेक अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या, देशाच्या भल्यासाठी झटत आहेत. गेले कित्येक दिवस अनेक कर्मचारी आपल्या घरीदेखील जाऊ शकलेले नाहीत. स्वत:च्या कुटुंबियांना, आपल्या चिमुकल्यांना सोडून ते देशासाठी अहोरात्र सेवा करत आहेत. अशाच कित्येक दिवस आपल्या नर्स आईला न भेटलेल्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा एक भावूक व्हिडिओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेळगावमधील जिल्हा रुग्णालयात सुनंदा या नर्सची सेवा बजावतात. कोरोनामुळे गेल्या 21 दिवसांपासून त्या आपल्या घरी गेलेल्या नाहीत. सुनंदा यांची चिमुकली आपल्या नर्स आईला कित्येक दिवस भेटली नाही. कोरोनामुळे आईशी ताटातूट झालेल्या चिमुकलीला तब्बल 21 दिवसांनंतर तिची नर्स आई भेटली. सुनंदा 3 आठवड्यांनंतर घरी गेल्या. अनेक दिवस मुलीपासून लांब राहिलेल्या नर्स आईला तिची मुलगी भेटल्यानंतर मात्र त्या मातेच्या अश्रूंचा बांध फुटला.


  


दरम्यान, 8 मार्च रोजी आईला भेटण्यासाठी चिमुकलीचा रडत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. नर्स आईला रुग्णालयातून काम केल्यानंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. चिमुकलीने आईला भेटण्यासाठी हट्ट केल्याने तिच्या वडिलांनी तिला आई राहत असलेल्या हॉटेलबाहेर नेलं. पण तिच्या आईला चिमुकलीला भेटता आलं नाही. आपल्या रडणाऱ्या चिमुकलीला आई जवळ घेऊ शकत नव्हती. आईने लांबूनच आपल्या मुलीला केवळ पाहिलं होतं. या आईची हतबलता तिच्या डोळ्यांतील अश्रूच सर्वकाही सांगून जात होते. 


पण आता 21 दिवसांनंतर या मायलेकींची भेट झाली आणि त्याचा आनंद दोघींच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोरोना व्हायरसमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी हा काळ किती कठीण आहे हेच समोर येतंय.