भुवनेश्वर : उडीसाच्या मलकानगरी जिल्ह्यातल्या मंता गावातल्या एका घराच्या अंगणात १२ फूट लांब मगर घुसली होती. बुधवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घर मालकाला घराबाहेर पडल्यावर अंगणामध्ये मोठी मगर दिसली. एवढ्या मोठ्या मगरीला बघितल्यावर पूर्ण कुटुंबच घाबरून गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दशरथ यांच्या कुटुंबाला बुधवारी रात्री भयानक आवाज ऐकू आला. या आवाजामुळे घरातल्या सगळ्यांचीच झोपमोड झाली. आवाज कसला आहे हे पाहण्यासाठी दशरथ घराबाहेर आले. घराबाहेरची १२ फुटांची मगर बघताच दशरथ यांच्या कुटुंबियांचं धाबं दणाणलं आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. दशरथच्या कुटुंबाचा गोंधळ ऐकून मग गावकरीही जमा झाले.


गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून मगरीला दोरीच्या सहाय्यानं झाडाला बांधलं. काही जणांनी याची माहिती वनविभागाला दिली आणि मग वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सतिगुडा बांधामध्ये जवळपास ३० ते ४० मगरी आहे. गावामध्ये अंडी देण्यासाठी ही मगर आली असेल कारण गाव बांधापासून एक किमी अंतरावर आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.