Russia Ukrain War : रशिया - युक्रेन युद्धाचा सर्वाधिक फटका खाद्यतेल आणि  किराणा मालाला बसत आहे. दोन दिवसात मालेगाव व मनमाडमध्ये खाद्यतेल किलोमागे 20 आणि किराणा मालाचे भाव 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेन-रशिया युद्धाचा फटका भारतीयांच्या रोजच्या जेवणालाही बसला आहे. किराणा माल आणि खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. किराणा मालाच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असून खाद्यतेलाच्या दराने प्रचंड उसळी घेतली आहे. दोनच दिवसात गोडतेलाचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढले तर महिनाभरात हेच भाव 40 रुपयांनी वाढले आहेत. 


खाद्यतेलासाठी लागणारे सुर्यफुल मोठ्या प्रमानावर युक्रेन आणि रशियातून येतं. तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. जागतिक स्तरावर सोयाबीनचा तुटवडा आहे. 


युक्रेन-रशियातल्या संघर्षानं कच्च्या तेलाचाही भडका उडालाय. भारत आयात करत असलेल्या ब्रेंट कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर्सच्या वर गेले आहेत. 


तांदूळ निर्यातदारांना फटका
पूर्व विदर्भातल्या तांदूळ निर्यातदारांचे कोट्यवधी रूपये रशिया आणि युक्रेनमध्ये अडकले आहेत. विदर्भ डेव्हलपेंट काऊन्सिलचे शिवकुमार राव यांनी ही माहिती दिली आहे. विदर्भातून दर महिन्याला 8 ते 10 हजार टन तांदळाची निर्यात दोन्ही देशात होते. मात्र आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य स्थितीमुळे अनेक शिपींग कंपन्यांनी बोटीतून तांदूळ पाठवायला नकार दिला आहे.


युद्धाच्या आडून साठेबाजी
दुसरीकडे युद्धाच्या आडून मोठ्या प्रमाणावर साठेबाजी करून नफेखोरी केली जात असल्याचा आरोप होत आहे मात्र या सर्व परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून महिन्याचं बजेट कोलमडल्याने जगावे असे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे.