महिला वैमानिकाला पाहून आजीबाई म्हणाल्या, `ओई..., यहाँ तो छोरी बैठी`
सोशल मीडियावर याचीच चर्चा...
नवी दिल्ली : पुरुषांचं अधिपत्य असणाऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये महिला त्यांच्या बरोबरीन कामगिरी करत आहेत. मुख्य म्हणजे अप्रूप वाटण्याजोगी ही बाब राहिली नाही. आता यात आश्चर्याची बाब नाही हेसुद्धा तितकंच चांगलं. कारण, समाजाचा बदलणारा दृष्टीकोन आणि एका सकारात्मक बदलाला मिळालेली स्वीकृती यातून स्पष्ट होत आहे.
स्त्री- पुरुष समानतेला स्वीकृती मिळत असली तरीही, जुन्या पिढीसाठी काही गोष्टी अद्यापही तितक्याच नव्या आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रसंगाची चर्चा सुरु आहे. जिथं विमानाच्या कॉकपीटमध्ये एका महिला वैमानिकाला पाहून वयोवृद्ध आजींनी अशी काही प्रतिक्रिया दिली की या महिला वैमानिकानं थेट सोशल मीडियावरच या प्रसंगाबाबतची माहिती दिली.
हाना खान नावाची ही वैमानिक दिल्ली- गया- दिल्ली या विमानाच्या कॉकपीटमध्ये तिची जबाबदारी पार पाडत होती. त्याचवेळी एका वयोवृद्ध महिलेने कॉकपीट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या कॉकपीटमध्ये पोहोचल्या तेव्हा हानाला तिथे पाहून अतिशय अनपेक्षित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 'ओई... यहां तो छोरी बैठी', असं त्या म्हणाल्या.
हरयाणवी अंदाजात त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहून त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित उमटलं. हानानं सोशल मीडियावर ज्यावेळी तिचा हा अनुभव शेअर केला तेव्हा अनेकांनीच तिची प्रशंसा केली. शिवाय तिचा हा अनुभव इतरही ठिकाणी शेअर केला.