नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉनचे उप प्रकार BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप प्रकारांनी भारतात दार ठोठावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप प्रकारांची प्रकरणे आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातच नोंदवली गेली आहेत. पण, हा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाही तर इतर राज्यातही या आजाराची प्रकरणे समोर येऊ शकतात अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron चे उप प्रकार BA.4 आणि BA.5 सौम्य मानले आहेत. WHO च्या म्हणण्यानुसार या दोन उप प्रकारांची लक्षणे तितकी तीव्र नाहीत. तसेच ती पूर्वीच्या प्रकारांसारखी संसर्गजन्य नाहीत. मात्र, विविध देशांतील रुग्णांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे असा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.


BA.4 आणि BA.5 हे किती धोकादायक?


कोरोना विषाणूच्या BA.4 आणि BA.5 या उप प्रकारांमुळे काही देशांमध्ये चिंता वाढली आहे. परंतु त्याचा भारतात कमी धोका आहे. कारण देशातील लोकांमध्ये ओमिक्रॉन विरूद्धची प्रतिकारशक्ती आधीच मजबूत आहे. मात्र, या प्रकारांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. 


BA.4 आणि BA.5 ची वेगवेगळी लक्षणे


संक्रमित रूग्णांच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे खूप महत्वाचे आहे असे तज्ञ सांगतात. कारण, BA.4 आणि BA.5 ची लक्षणे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसली आहेत. BA.4 आणि BA.5 चा संसर्ग झाल्यास ताप, डोकेदुखी, उलट्या आणि ओटीपोटात दुखणे, घसा खवखवणे, खोकला यासारखी सामान्य लक्षणे दिसतात.