नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची प्रकरण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन रुग्ण आढळल्यानंतर, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे, ब्रिटनसारखी परिस्थिती येऊ नये अशी अशा आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमध्ये एका दिवसात 10,000 हून अधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यूकेमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची ९०,००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.


जगाच्या इतर भागात संसर्गाची प्रकरणं वाढतात तेव्हा आपण बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार तयारी केली पाहिजे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर डॉ. गुलेरिया यांनी सतर्क केलं होतं. ओमायक्रॉनमध्ये ३० हून अधिक म्यूटेशन आढळले आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच लसीकरण गांभीर्याने करण्याची गरज असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं आहे.


देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका
ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ४५ वर्षीय अनिवासी भारतीय आणि एका किशोरवयीन मुलाला पहिल्यांदा ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १५१ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र (54), दिल्ली (22), राजस्थान (17), कर्नाटक (14), तेलंगणा (20), गुजरात (9), केरळ (11), आंध्र प्रदेश (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि पश्चिम बंगालमध्ये (1) ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.


महाराष्ट्रात टेन्शन वाढलं
रविवारी महाराष्ट्रात आणखी ६ प्रकरणे नोंदवली गेली, तर तेलंगणामध्ये ओमायक्रॉन  प्रकरणांची संख्या आठ वरून २० झाली,  कर्नाटक आणि केरळमध्ये अनुक्रमे सहा आणि चार प्रकरणे नोंदवली गेली. 


WHO ने दिला इशारा
Omicron व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक उपाययोजना तातडीने वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. देशात ठोस आणि कठोर उपाययोजना ओमायक्रॉन रोखू शकतो असं WHO च्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक पूनम खेतरपाल सिंग यांनी सांगितलं. हाय रिस्क नागरिकांवर लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.