Omicron : WHO ने कोरोनाच्या नवीन प्रकाराला `चिंतेचा विषय` का म्हटलं?
हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात चिंतेचं वातावरण आहे. हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या नवीन व्हेरिएंटला 'ओमायक्रॉन' (Omicron) असे म्हटले जात आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) प्रकरणं समोर आल्यानं भारताने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. केंद्र सरकारने सोमवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. यानुसार, लसीकरण झालेलं असलं तरी याच्या संसर्गाचा धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.
या प्रकाराबाबत तज्ज्ञांचे मत काय?
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणतात की, ओमिक्रॉन नावाच्या नवीन प्रकाराबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे, ती अनेक शक्यता दर्शवते, परंतु कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची वैज्ञानिक आधारावर चाचणी करणे आवश्यक आहे.
डॉ गुलेरिया यांनी रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ओमिक्रॉनचे 30 हून अधिक म्यूटेशन झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे म्यूटेशन किंवा बदल विषाणूच्या स्पाइक प्रोटीन प्रदेशात झाले आहेत.
डॉ गुलेरिया म्हणाले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या क्षेत्रामध्ये म्यूटेशन झाल्यामुळे, या प्रकारात अशी क्षमता विकसित होऊ शकते, ज्यामुळे तो शरीराच्या इम्यूनीटीपासून वाचू शकतो. म्हणजेच त्याच्यावर लस किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही, जी एक गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्व कोविड लसींचा आढावा घ्यावा लागेल. कारण बहुतेक लसी स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध प्रतिपिंडे विकसित करतात आणि त्या आधारावर ही लस कार्य करते.
हा व्हेरिएंट कसा आला?
विषाणूचा हा नवीन प्रकार या महिन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर संस्थेने 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला या नवीन प्रकाराची पुष्टी केली आणि एक निवेदन जारी केले.
WHO चं यावर मत काय?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या आठवड्यात कोरोना वायरच्या या नवीन प्रकाराला चिंतेची बाब असल्याचे सांगितले आणि त्याला ओमिक्रॉन असे नाव दिले. संस्थेने एक निवेदन जारी केले होते की, या प्रकारात अनेक म्यूटेशन आहेत आणि त्यातून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.
शास्त्रज्ञांना धक्का
दक्षिण आफ्रिकेशिवाय कोरोनाचे हे नवीन रूप आता जगातील अनेक देशांमध्ये आढळून आले आहे. यामध्ये बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल, जर्मनी, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा यांनी स्पष्ट केले की, ओमिक्रॉन इतर प्रकारांपेक्षा "खूप भिन्न" आहे आणि "म्यूटेशनचा असामान्य क्लस्टर" पाहिला आहे.
ते म्हणाले, "या प्रकाराने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे, सर्वसाधारणपणे व्हायरसमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतात आणि आम्ही काय अपेक्षा करतो त्यानुसार ते खूप वेगाने बदलत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रोफेसर डी ऑलिव्हेरा म्हणाले की, यामध्ये एकूण 50 म्यूटेशन झाले आहेत आणि 30 हून अधिक हे स्पाइक प्रोटीनमध्ये झाले आहेत.
आपल्या शरीरातील पेशींशी संपर्क साधणाऱ्या विषाणूच्या भागाबद्दल सांगायचे तर, त्यात 10 म्यूटेशन झाले आहेत. तर डेल्टा व्हेरियंटमध्ये दोन म्यूटेशन झाले, ज्यामुळे जगभरात हाहाकार माजला.
म्यूटेशन किती गंभीर आहे?
सर्व म्यूटेशन वाईट असतात असे नाही, पण त्यात काय म्युटेशन झाले हे पाहणे गरजेचे आहे.
परंतु, चिंतेची बाब म्हणजे हा विषाणू चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या मूळ व्हायरसपेक्षा वेगळा आहे. याचा अर्थ त्या मूळ विषाणूला लक्षात घेऊन बनवलेल्या लस या प्रकारावर कदाचित काम करणार नाही.
असे म्हटले जाते की, कोव्हिड बाबत अशी देखील उदाहरणे आहेत जी कागदावर भितीदायक दिसली, परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. वर्षाच्या सुरुवातीला, बीटा प्रकार चिंतेचे कारण बनले कारण ते रोगप्रतिकारक शक्ती टाळण्यात अधिक पारंगत होते. पण नंतर डेल्टा प्रकार जगभर पसरला आणि खूप त्रास झाला.