देशात झपाट्यानं वाढतोय ओमायक्रॉन? पुण्यापाठोपाठ आणखी एका शहरात 9 रुग्ण
झपाट्याने वाढतायत ओमायक्रॉन रुग्ण.... देशात फुटणार ओमायक्रॉनचा बॉम्ब?
जयपूर: देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आधी कर्नाटक नंतर महाराष्ट्र त्या पाठोपाठ दिल्ली आणि आता जयपूरमध्ये देखील ओमायक्रॉन पोहोचला आहे. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड पाठोपाठ जयपूरमध्ये देखील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 9 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जण दक्षिण आफ्रिकेतून आले होते. तर उर्वरित 5 लोक त्यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली होती.
जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे 9 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. या 9 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये 7 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. 6 जण पिंपरी चिंचवडचे तर 1 पुण्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात आणखी ८ जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय. पिंपरी चिंचवडमधल्या ६ जणांना तर पुण्यातल्या एकाला ओमायक्रॉन झाला. तर पुण्यात फिनलंडहून आलेल्या एकाला ओमायक्रॉनची लागण झाली.
पिंपरीमध्ये असलेल्या भावाला भेटायला नायजेरिया शहरातून त्याची बहीण आणि तिच्या मुली आल्या होत्या. त्यांना ओमायक्रॉन झाल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या भावाला आणि त्याच्या दोन मुलींनाही ओमायक्रॉन झाला.
या सहा जणांपैकी तिघी मुली १८ वर्षांच्या खालच्या असल्यानं त्यांनी लस घेतली नव्हती. तर इतर तिघांना लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना ओमायक्रॉनची लागण झालीये. सध्या सगळ्यांवर पिंपरीमधल्या जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विशेष म्हणजे हे ओमायक्रॉन बाधित हाय रिस्क देशांमधून आलेले नाहीत. तसच लहान मुलांनाही ओमायक्रॉनची बाधा होत असल्याचं स्पष्ट होत आहे.