मुंबई : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये आता वाढ होत आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन विषाणूची नोंद झाली आहे. राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 9 सदस्य ओमायक्रॉन विषाणूने बाधित आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात 7 आणि दिल्लीत 1 रुग्ण आढळून आला आहे. ओमायक्रॉन खूप वेगाने वाढत आहे आणि 4 दिवसात 21 केसेस आढळून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायजेरियातील महिला ओमायक्रॉन
 मुळची भारतीय असलेली 44 वर्षीय नायजेरियन महिला तिच्या 12 वर्षे आणि 18 वर्षे वयाच्या दोन मुलींसह 24 नोव्हेंबर रोजी पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तिच्या भावाला भेटण्यासाठी आली. तिघांच्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात ओमायक्रॉन विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत.


 त्याचा 45 वर्षांचा भाऊ आणि त्याची दीड आणि 7 वर्षांच्या दोन्ही मुलींमध्ये ओमायक्रॉनचे व्हेरिएंट मिळाले आहेत. या 6 जणांपैकी 3 जण 1 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत आणि 3 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.


फिनलंडहून परतलेल्या प्रवाशाला लागण


पुण्यात राहणाऱ्या आणखी एका 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत ही व्यक्ती फिनलंडमध्ये होती. 29 नोव्हेंबर रोजी तापानंतर त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.


ज्याचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले होते.


दिल्लीत आढळले ओमायक्रॉनचे विषाणू


रविवारी दिल्लीत ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. बाधित रुग्ण टांझानियाहून आला होता. त्यांला दिल्ली सरकार संचालित लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


पहिल्या 2 रुग्णांची कर्नाटकात नोंद


ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या पहिल्या दोन रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली. गुजरात आणि महाराष्ट्रात शनिवारी तिसरा आणि चौथा रुग्ण आढळून आला. 


दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी रविवारी सांगितले की, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या 12 नमुन्यांचे अहवाल आले आहेत. एकूण 12 पैकी फक्त एक व्यक्ती पॉझिटिव आली आहे.