नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. सुमारे 101 संरक्षण क्षेत्रातील उपकरणं भारतातच बनवल्या जाणार आहेत. येत्या काळात त्याची आयात पूर्णपणे बंद केली जाईल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण करतील तेव्हा ते आत्मनिर्भर भारत उपक्रमात आणखी भर टाकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, 'संरक्षण क्षेत्रातील 101 वस्तू देशातच बनविण्याचा निर्णय हा खूप मोठा दृष्टीकोन आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी मोठं पाऊल टाकतील.'


संरक्षणमंत्री म्हणाले की, कोरोना संकटामुळे हे स्पष्ट झाले आहे की देशाला आत्मनिर्भर बनविणे आवश्यक आहे आणि बाह्य गोष्टींवर अवलंबून राहू शकत नाही. भारत सरकार देशाच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही.


राजनाथ सिंह म्हणाले की, मेक इन इंडियाला संरक्षण क्षेत्रात प्रोत्साहन दिले जात आहे, छोट्या वस्तूंबरोबरच देशात मोठी शस्त्रेही बनविली जातील. लवकरच भारत ही शस्त्रे निर्यात करण्यासही सक्षम होणार आहे.


संरक्षण क्षेत्रात रविवारी टप्प्याटप्प्याने 101 उपकरणांवर आयात बंदी केली जाणार असल्याची घोषणा झाली. या वस्तूंची आयात 2020-2024 पर्यंत थांबविली जातील, यावेळी देशात त्यांच्या उत्पादनाची व्यवस्था केली जाईल.


'विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. त्याअंतर्गत एमएसएमई क्षेत्राला दिलासा देण्यात आला, छोट्या व्यापाऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले. या घोषणेनंतर आतापर्यंत वेगवेगळ्या मंत्रालयांनी स्वदेशी वस्तूंना त्यांच्या पातळीवर प्रोत्साहन देण्याची, बाह्य वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट रोजी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिशेने आणखी एक मोठी घोषणा करू शकतात.' असे संकेत संरक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.