आजच टाकी फुल्ल करा; 31 मे रोजी पेट्रोल पंपांवर खडखडाट?
पेट्रोल पंप सुरु असणार, पण...
Petrol Dealers Strike: महाराष्ट्रात आधीच पेट्रोलच्या दरांनी सर्वसामान्यांना घाम फोडलेला असताना आता 31 मे हा दिवस आणखी आव्हानं घेऊन येणार आहे. कारण, या दिवशी पेट्रोल पंप डीलर संपावर जाणार आहेत. कमीशन / मार्जिन वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार आहे. परिणामी या दिवशी इंधन खरेदीही बंद असेल. थोडक्यात या दिवशी पेट्रोल पंपावर खडखडाटही असू शकतो.
पेट्रोल पंप सुरु असणार, पण...
हल्लीच केंद्र शासनानं पेट्रोलची किंमत 8 आणि डिझेलची किंमत 6 रुपयांनी कमी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या संपाचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. पण, तरीही पेट्रोल भरून वाहनांची टाकी फुल्ल करण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ सुरु होणार यात शंका नाही.
काय आहे पेट्रोल पंप मालकांची मागणी ?
एकिकडे केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले असतानाच तिथं पंप चालक- मालकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या निर्णयामुळे या मंडळींचं मोठं नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आली.
सरतेशेवटी सरकारचा विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पेट्रोल पंप चालक- मालक संघटनांशी संलग्न व्यक्तीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं.