Congress Donation Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासोबात ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने 'डोनेट फॉर देश' (Donate for Desh) नावाची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांना 138, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा 10 पट रक्कम पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी दान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे 'जनतेचा पैसा हडप करण्याचा आणि गांधी कुटुंबाला समृद्ध करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे' असा आरोप करत भाजपने या मोहिमेवर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसने ज्या वेबसाईटद्वारे देणगी देण्याचे आवाहन केले आहे त्यावर क्लिक केल्यास भाजपचे डोनेशन पेज उघडत आहे. काँग्रेसने भाजपवर बनावट डोमेन तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस पक्षाची 'डोनेट फॉर देश' क्राउडफंडिंग मोहीम सुरू झाल्यानंतर काही तासांतच तांत्रिकदृष्ट्या विस्कळीत झाली आहे. 'डोनेट फॉर देश' हे डोमेन भाजपच्या नावावर आधीच नोंदणीकृत आहे. त्यामुळे DonateforDesh.org वर क्लिक केल्यावर देणगीदारांना भाजपच्या डोनेशन पेजवर नेले जात होते. डोनेट फॉर देश डॉट कॉम युजर्सना OpIndia वेबसाइटच्या सबस्क्रिप्शन पेजवर घेऊन जाते. डोनेशन फॉर देश मोहिमेसाठी काँग्रेसकडे  असलेले डोमेन donateinc.net आहे. त्यावर क्लिक केल्यावर इंडियन नॅशनल काँग्रेसचे पेज ओपन होते. मात्र भाजपने लोकांना भ्रमित करण्यासाठी बनावट डोमेन तयार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 


माध्यमांच्या वृत्तानुसार, काँग्रेसने  क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली, पण डोनेट फॉर देशसाठीच्या डोमेनची नोंदणी करणे विसरले. काँग्रेसने देणगी मोहिमेची घोषणा करण्यापूर्वी 'डोनेट फॉर देश' नावाने कोणतेही डोमेन रजिस्टर केले नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही ब्राउझरवर DonateforDesh.org टाइप करून सर्च केल्यास भाजपची वेबसाइट उघडते. इतकंच नाही तर सर्च केल्यानंतर वेबसाइटच्या होमपेजऐवजी थेट डोनेशन पेज उघडत आहे. DonateforDesh.org टाइप केल्यावर जे पेज येते त्यावर पंतप्रधान मोदींचे चित्र आहे, भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ आहे. या सगळ्या गोंधळानंतर आता DonateforDesh.org सर्च केल्यावर एक नवीन युआरएल उघडते. मात्र त्यावर आता कोणतेही भाजपचे चिन्ह दिसत नाही. मात्र खाली भाजप नेत्यांची नावे दिसत आहेत.



काँग्रेसची टीका


दरम्यान, या सगळ्या प्रकारावरुन काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांनी भाजप घाबरलेल्या स्थितीत आहे असं म्हटलं आहे. "सत्ता, सर्व संस्था, सर्व संसाधने, पैसा असूनही भाजप इतका घाबरतो का? काँग्रेसने देणगी मोहीम सुरू केल्यावर ते घाबरलेच नाही तर त्यांची यंत्रणाही बनावट डोमेन तयार करून दिशाभूल करू लागली आहे. तुम्ही फक्त http://donateinc.in वरून काँग्रेसच्या कार्यासाठी देणगी देऊ शकता. तसे, आमची कॉपी केल्याबद्दल धन्यवाद. तुमची भीती पाहून छान वाटले," असे सुप्रिया श्रीनेट यांनी म्हटलं आहे.