साध्वी प्रज्ञाची उमेदवारी रोखण्याच्या अर्जावर असं मिळालं `एनआयए`चं उत्तर
भारतीय जनता पार्टीनं दहशतवादाचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय
नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची उमेदवारी रोखली जावी, अशा आशयाच्या याचिकेवर 'एनआयए'नं उत्तर दिलंय. 'साध्वी प्रज्ञाशी नगडीत प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. कारण हे प्रकरण निवडणूक आणि निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. त्यामुळे यावर जो काही निर्णय घ्यायचाय तो निवडणूक आयोगानंच घ्यायला हवा' असं एनआयएनं म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, साध्वी प्रज्ञा हिच्याविरुद्ध स्फोट प्रकरणाची चौकशी एनआयएकडेच आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयानं अर्जावर एनआयएकडे उत्तर मागितलं होतं त्यावर एनआयाएनं कोर्टात हा मुद्दा आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरचा असल्याचं म्हटलंय.
भारतीय जनता पार्टीनं दहशतवादाचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. साध्वी प्रज्ञा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहे. उल्लेखनीय म्हणजे, २०१७ मध्ये साध्वी प्रज्ञा हिला 'छातीचा कर्करोग' असल्याचं आणि तिला साध चालता येणंही शक्य नसल्याचं उच्च न्यायालयासमोर सांगण्यात आलं. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रज्ञा ठाकूर नऊ वर्षांपर्यंत तुरुंगात होती. तिच्यावरील 'मकोका'चे आरोप हटवण्यात आले असले तरी या प्रकरणाशी निगडीत खटला अद्यापही मुंबई हायकोर्टाच्या विचाराधीन आहे.
याचाच अर्थ, 'एनआयए'नं साध्वी प्रज्ञाच्या निवडणूक लढण्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. विशेष म्हणजे, जवळपास वर्षभरापूर्वी साध्वी प्रज्ञाला मिळालेल्या जामिनावरही एनआयएनं कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता.