श्रीनगर : जुलै २०१६मध्ये दहशतवादी बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर काश्मीरमध्ये तणाव पसरला होता. काश्मीरी युवकांकडून लष्करावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. यानंतर दहशतवाद्यांनी लहान मुलं आणि सामान्य नागरिकांना पुढे करून लष्करावर दगडफेक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी एप्रिलमध्ये दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये एक डझनापेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले होते. कुलगाम जिल्ह्यातल्या डिग्री कॉलेजच्या २५० विद्यार्थ्यांनी लष्करानं अत्याचार केल्याचा आरोप करत आंदोलन केलं.


२०१६च्या तुलनेत २०१७मध्ये काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना ९० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. एनआयएचे छापे, नोटबंदी आणि दहशतवादी कमांडरविरोधात झालेल्या कारवायांमुळे हे हल्ले कमी झाले आहेत. आधी दिवसाला दगडफेकीच्या ४०-५० घटना होत होत्या.


काश्मीरमधली दगडफेकीची परिस्थिती आता बदलली आहे. श्रीनगरमधून आलेले हे फोटो काश्मीरमधल्या नवीन पिढीचा नवा दृष्टीकोन दाखवत आहे. ज्या लष्करावर ही मुलं दगडफेक करत होती तीच मुलं आज लष्कराबरोबर क्रिकेट खेळत आहेत.



जुन्या श्रीनगरमधील नौहट्टा जामिया मशिदीजवळ याआधी कायमच दगडफेक व्हायची. पण आता ही अनोखी मॅच पार पडली. काश्मीरमध्ये बंद असताना मुलं पोलीस आणि लष्कराच्या जवानांवर दगडफेक करायचे. प्रत्युत्तर म्हणून लष्कर आणि पोलिसांकडून अश्रूधुरांचा वापर करण्यात यायचा. पण आता पोलीस आणि नोहट्टामधल्या स्थानिक मुलांची क्रिकेट मॅच इकडे पाहायला मिळत आहे.



या भागातली ५ मुलं पोलिसांसोबत क्रिकेट मॅच खेळली. दगडफेकीपासून वाचण्यासाठी ज्या लाकडी संरक्षण जाळ्या पोलीस वापरत होते त्या जाळ्या आता स्टम्प म्हणून वापरण्यात येत आहेत.