नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. रविवारी रात्री चंदन साहू नावाच्या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्यात आलं. २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा गावात हा प्रकार घडला.  काही अज्ञात इसमांनी रात्री साडे दहाच्या सुमारास चंदन घरी परत येत असताना त्याच्या घराजवळच गोळीबार केला. हल्लेखोर दोन दुचाकी घेऊन आले होते. त्यांनी चंदनला हटकलं आणि अत्यंत जवळून त्याला गोळ्या घातल्या. स्थानिकांनी चंदनला भाटपाऱ्यातील सरकारी रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यानं प्राण सोडला. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. गेल्या ७२ तासात बंगालमधील हिंसाचारात ३ जणांचा बळी गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे उत्तर प्रदेशातल्या अमेठीत झालेल्या भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंहांच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक झाली आहे. तर दोघे जण फरार आहेत. बीडीसी रामचंद्र, धर्मनाथ गुप्तासह पाच जण आरोपी आहेत. नसीम, रामचंद्र बीडीसी, धर्मनाथ आणि नसीमला गुन्हे शाखेनं अटक केली. अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची शनिवारी हत्या झाली होती. 


रविवारी स्मृती इराणींनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. भावूक झालेल्या स्मृती यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.  यावेळी स्मृती इराणी यांचे आश्रू अनावर झाले होते.