नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच Congress काँग्रेस पक्षात आलेलं नाराजी, पक्षनेतृत्त्वं यासंबंधीचं वादळ शमत नाही, तोच आता आणखी एका वादळाचे संकेत मिळाले आहेत. हे वादळ आता आक्रमक स्वरुप प्राप्त करणार की इतक्यावरच शमणार, याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या नव्या वादळाला कारण ठरत आहे आणखी एक पत्र.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षातील परिस्थितीबाबत हे पत्र आलं आहे थेट उत्तर प्रदेशातून. मागील वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या ९ काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा sonia gandhi सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवलं आहे.  ज्यामध्ये त्यांनी अत्यंच सूचक इशारा देत पक्षाला 'इतिहास' होण्यापासून वाचवण्याची बाब अधोरेखित केली आहे. 


कुटुंबाचा मोह सोडा... 
काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पक्ष प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर पत्रातून अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला. चार पानांच्या या पत्रातून सोनिया गांधी यांनी कुटुंबापलीकडेही विचार करावा असा आग्रही सूर आळवण्यात आला आहे. 'परिवार के मोह से ऊपर उठें', असं या पत्रात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे. शिवाय पक्षातील लोकशाही परंपरेला पुन्हा संजीवनी द्यावी असं म्हटलं गेलं आहे. 


काँग्रेससाठी आव्हानाचा काळ... 
संतोष सिंह, सत्यदेव त्रिपाठी, विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांच्या स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रातून काँग्रेस सध्या आव्हानात्मक काळातून जात असल्याचं स्पष्टपणे म्हटलं गेलं आहे. जवळपास वर्षभरासाठी आपल्या भेटीसाठी वेळ मागत असूनही आम्हाला वेळ दिली जात नाही हा मुद्दा पत्रातून उचलून धरण्यात आला. आपल्या निलंबनाबाबत केलेल्या आवाहनाबाबत देश पातळीवर काम करणाऱ्या समितीला विचार करण्याचाही वेळ मिळाला नसल्यामुळं याबाबतची नाराजीही व्यक्त करण्यात आली. 




 


अतिशय गंभीर मुद्दे मांडत सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रामुळं आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये वादग्रस्त वारे घोंगावत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता हे वारे नेमके काय परिणाम करणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.