श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील गुसू येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. तसेच एक भारतीय जवान शहीद झाला. दरम्यान, पोलीस आणि सुरक्षा दलाने ही संयुक्तपणे कारवाई केली. गुसू भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती आल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांने या भागात शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी गोळीबार सुरु केला. यात १ दहशतवादी ठार झाला. तर एक जवान शहीद झाला.


या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरुच आहे. जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


या पूर्वी ५ जुलै या दिवशी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट करत हल्ला केला होता. या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार केला.