बंगळुरू: चार्जिंगला फोन लावल्यानं स्फोट झाल्याची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक मोबाईल ब्लास्टची घटना समोर आली आहे. नामांकीत कंपनी OnePlusच्या मोबाईल फोनमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं याची माहिती सोशल मीडियावर शेअर देखील केली आहे. OnePlus Nord 2 22 जुलै रोजी लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

gizmochina ने दिलेल्या वृत्तानुसार एक महिला आपल्या स्लिंग बॅगमध्ये हा फोन ठेवून सायकल चालवत होती. त्याचवेळी या फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. या महिलेच्या पतीने यासंदर्भात ट्वीट करून वन प्लस कंपनीला टॅग केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या फोनची चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूतील अंकुर शर्मा यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली. या ट्वीटमध्ये फोटोही जोडले आहेत. 


अंकुल शर्मा यांची पत्नी या घटनेमुळे सदम्यामध्ये आहे. यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकली असती. सायकलिंग करत असताना फोनमध्ये स्फोट झाला आणि धूर आला.  OnePlus Nord 2 ची बॅटरी फुटल्याचं त्यांनी आपल्य़ा ट्वीटमध्ये सांगितलं आहे.  




वनप्लस नॉर्ड 2च्या फोनमध्ये स्फोट झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. अंकुरच्या ट्विटनंतर कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ट्विटरवरील वनप्लस सपोर्ट अकाउंटने लिहिले, 'तुमच्या अनुभवाबद्दल ऐकून आम्ही दुःख आहोत. आम्ही चिंतेत आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही थेट मेसेज करून आमच्याशी संपर्क करा. जेणेकरून आम्ही नेमकं काय झालं असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करू असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


अंकुरने त्यानंतर ट्वीट हटवल्याने कंपनीने त्यांना नुकसान भरपाई किंवा फोन दिला असावा असा अंदाज आहे. कंपनीसोबत त्यांचं एकमत झाल्याने त्यांनी हे ट्वीट हटवलं असावं अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका नामांकीत कंपनीचा फोन चार्जिंगला लावला असताना तरुणी फोनवर बोलत होती आणि त्याचा स्फोट होऊन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.