नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की, सध्याची जगाची परिस्थिती ही भारतासाठी एक संधी बनू शकते, अशा परिस्थितीत आपल्याला स्वावलंबी बनले पाहिजे. पीएम मोदींनी लोकलसाठी वोकल बनण्याची घोषणा दिली. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) कँटीनवर फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा आदेश 1 जूनपासून देशभरातील सर्व कॅन्टीनना लागू होईल. अंदाजे 10 लाख सीएपीएफ जवानांमधील 50 लाख कुटुंबे स्वदेशी वस्तू वापरतील असा अंदाज आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अमित शहा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'काल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आवाहन केलं की, स्थानिक उत्पादनांचा (भारतातील उत्पादित पदार्थ) वापर करावा ज्यामुळे भविष्यात भारताला जगाचे नेतृत्व करण्यास निश्चितच मदत होईल. या दिशेने गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) कँटीनमध्ये आता फक्त स्वदेशी उत्पादने विकले जातील.


याशिवाय अमित शहा यांनी देशातील लोकांना देशात बनवलेल्या जास्तीत जास्त उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहनही केले. त्यांनी लिहिले, 'मी देशातील लोकांना आवाहन करतो की तुम्ही देशात तयार केलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतर लोकांनाही प्रोत्साहित करा. प्रत्येक भारतीयाने देशात (स्वदेशी) बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते.


मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, कोरोना संकटामुळे स्थानिक उत्पादन, पुरवठा साखळीचे महत्त्व आम्हाला स्पष्ट झाले आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, लोकलला आता आपला जीवन मंत्र बनवावा लागेल. प्रत्येकाने लोकल उत्पादने खरेदी करावीत आणि त्यांची जाहिरातही केली पाहिजे.