मुंबई : भारतीय सैन्यदलातील काश्मीर स्थित पंधराव्या तुकडीने खोऱ्यात राबवलेल्या 'ऑपरेशन माँ' या मोहिमेला मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. कुटुंबाला सोडून दहशतवादाच्या वाटेवर निघालेल्या जवळपास ५० युवकांची या मोहिमेमुळे घरवापसी झाली आहे. सैन्यातील या तुकडीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंग ढिल्लों यांच्या नेतृत्वात या मोहिमेची सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढिल्लों यांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत बेपत्ता तरुणांना शोधून त्यांच्या आप्तजनांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सैन्याकडून घेण्यात आली. सैन्यदलातील पंधरावी तुकडी ही 'चिनार' म्हणूनही ओळखली जाते. या तुकडीकडून काश्मीर खोऱ्यात आणि नियंत्रण रेषेवर दहशतवादाशी लढा देण्यासाठीच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आलं आहे. 


सैन्याच्या या मोहिमेविषयी सांगताना ढिल्लों म्हणाले, 'सर्वप्रथम चांगलं काम करा, मग आपल्या आईची सेवा करा त्यानंतर आपल्या वडिलांकडे जा आणि त्यांचीही सेवा करा असं पवित्र कुराणमध्ये सांगण्यात आलं आहे. याच उपदेशाची या भरकटलेल्या युवकांना परत आणण्यास मदत झाली.'


युवक बेपत्ता असणाऱ्या कुटुंबीयांचे संदेश दाखवत आणि त्यांच्या ओळखीच्या बाबतीत गोपनीयता पाळत हे संदेश म्हणजे काश्मीर खोऱ्याची एक अमुल्य भेट आहे असंही ढिल्लों म्हणाले. सध्याच्या घडीला सैन्यदलाच्या या प्रशंसनीय मोहिमेप्रती आणि एकंदरच सैन्याप्रती खोऱ्यातील नागरिकांच्या मनात प्रचंड आदर असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्य म्हणजे या मोहिमेच्या वेळी अनेकदा चकमक थांबवत या दहशतवाद्यांनी शरणागती पत्करल्याच्याही घटना घडल्या आहेत. 



नुकतच 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत त्यांनी ही माहिती दिली. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक होत असल्याचं कळताच या युवकांच्या/ दहशतवाद्यांच्या आईला संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न असतो. ज्यानंतर आई आणि त्यांच्या मुलांचा कसा संपर्क साधता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेकदा तर, काही कारवायांदरम्यान आई- मुलांची मिठी आणि काही भावनिक क्षणही पाहायला मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्य म्हणजे या साऱ्यातून अनेक जीव वाचले ही बाब अधोरेखित करण्याजोगी. आम्हाला मृतदेह मोजण्यात रस नाही, तर तो आकडा मोजण्याकडे आमचा कल आहे ज्या युवकांना आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या आत्पजनांकडे पोहोचवू शकलो आहोत, असं म्हणत यंदाच्या वर्षी आतापर्यंत ५० युवकांची घरवापसी दिलासा देवून गेल्याचं ढिल्लों यांनी सांगितलं.