मुंबई : स्वत:चा व्यवसाय करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हीच इच्छा आणि बदलत्या काळाचा अंदाज घेत एक नवी संधी भारतीय टपाल खात्याकडून देण्यात येत आहे. जर तुम्हाला कुरिअर सेवेचा अनुभव असेल आणि यात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ज्यासाठी तुम्हाला पोस्टाकडून त्यांची शाखा घ्यावी लागणार आहे. 


शाखा घेण्याची प्रक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा व्यवसाय करण्याची इच्छा अनेक तरुणांची असते. पण आर्थिक भांडवल नसल्याने व्यवसाय करणे हे एक स्वप्नच राहते. पण पोस्टासोबत व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला ५००० रुपये आगाऊ (डिपॉझीट) रक्कम म्हणून जमा करावी लागणार आहे. शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे. पोस्ट शाखसाठी अर्ज केल्यानंतरच्या १४ दिवसांच्या कालावधीत किमान विक्री किंमतीच्या निकषानुसार निवड केली जाणार आहे.


या आहेत अटी


१ )  पोस्टाची शाखा मिळवण्यासाठी सर्वात आधी त्यासाठी अर्ज करुन तो जमा करावा लागणार आहे.


२ )  पोस्ट शाखेसाठी तुमची निवड केल्यानंतर भारतीय पोस्टा सोबत तुम्हाला सामंजस्य करार करावा लागेल.


३ )  पोस्टाची शाखा मिळवण्यासाठी पोस्ट विभागाने शिक्षणाची अट घातली आहे. अर्जदाराचे शिक्षण किमान ८ वी पास झालेले असावे. 


४ )  अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.


कोण घेऊ शकतो शाखा ?


पोस्टाची शाखा घेण्यासाठी पोस्टाकडून कोणत्याही प्रकराची अट घातलेली नाही. यासाठी कोणीही अर्ज करु शकतात. संघटना, संस्था, लघु मध्यम व्यवसायिक, विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) नागरिक, महाविद्यालये, विद्यापीठ यासारखे अनेक संस्था किंवा संघटना पोस्टाची शाखा मिळवण्यासाठी अर्ज करु शकतात.


सोबतच जे कर्मचारी पोस्ट विभागात कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबाला देखील पोस्टाची शाखा घेता येणार आहे. पण त्यासाठी एक अट घातली आहे. ते कर्मचारी ज्या भागातील शाखेत कार्यरत आहेत, त्या भागात तुम्हाला शाखा मिळणार नाही. ही शाखा घेण्यासाठी त्या कर्मचाऱ्याची पत्नी, त्याचे अपत्य आणि त्याचे रक्त संबंधातील नातेवाईक शाखा घेण्यासाठी अर्ज करु शकतात.


नफा


पोस्ट ऑफिसच्या शाखेचे उत्पन्न हे कमीशन नुसार होते. यासाठी पोस्ट ऑफिसकडून शाखा घेतलेल्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला व्यवसाय पुरवला जातो. या सर्व सेवांनुसार  पोस्टाची शाखा घेतलेल्या त्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला निश्चित अशी टक्केवारी दिली जाते. या सर्व कराराची माहिती आणि टक्केवारीची पुर्वकल्पना ही सामंजस्य करारात दिलेली असते.


 १)    रजिस्टर्ड पोस्टच्या बुकिंगवर ३ रुपये. 


२ )   स्पीड पोस्टच्या बुकिंगवर ५ रुपये.


३ )   १०० ते २०० रुपयांच्या मनीऑर्डरवर ३.५० रुपये.


४ )   २०० पेक्षा अधिकच्या मनीऑरर्डवर ५ रुपये. 


५ )   प्रत्येक महिन्यात १००० पेक्षा अधिक  साधारण आणि स्पीड पोस्टचा व्यवसाय करुन दिल्यास अतिरिक्त २० टक्केवारी. 


६ )   पोस्टाची तिकीटे, स्टेशनरी आणि मनी ऑर्डरचे अर्ज विक्रीतून मिळालेल्या रक्कमेतून ५ ट्क्के अधिकचा नफा.


७ )   रेवेन्यू स्टॅंप आणि केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठीच्या परीक्षेसाठी लागणारे स्टँप आणि तत्सम वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचे ४० ट्क्के रकमेचा   फायदा.


 


पोस्टाची शाखा सुरु करण्यासाठी, त्यासाठीचे अर्ज आणि अधिक माहितीसाठी खालील लिंक  देण्यात आली आहे. 


https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf



पोस्टाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा


१ )  स्टँप आणि स्टेशनरी, साधारण कुरिअर, स्पीड पोस्ट आणि मनी ऑर्डर बुकिंग करण्याची सेवा.  


२ )  बिल, टॅक्स, आणि दंडाची रक्कम भरण्याची सुविधा. 


३ )  पोस्टाकडून भविष्यात देण्यात येणाऱ्या सुविधा.