Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना राष्ट्रीय राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत भाजपा (BJP) आणि शिंदे सरकारला (Eknath Shinde) पाठिंबा दिल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या हेतूने ही बैठक होणार होती. जेडीयूचे वरिष्ठ नेते के सी त्यागी यांनी बैठक रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बैठक सध्या रद्द केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच लवकर नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशानानंतर ही बैठक होईल असं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा आणि कर्नाटक विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक टाळण्यात आल्याचं बोललं जात आहे. बिहार विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 10 ते 24 जुलैपर्यंत असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयूने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे बैठक स्थगित करण्याची विनंती केली होती. कारण नितीश आणि तेजस्वी विधानसभा अधिवेशनात व्यग्र असणार आहेत.
पाटण्यात झाली होती विरोधकांची बैठक
23 जूनला पाटण्यात 15 विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी बैठक झाली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, एमे स्टॅलिन यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह 5 राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.
या बैठकीत 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाला सत्तेतून हटवण्याच्या धोरणावर चर्चा झाली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतून एकमत झालं नसल्याची माहिती दिली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्वांनी मिळून निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली होती.
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राजभवनात जाऊन शपथ घेतली आहे. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवून ही कृती करण्यात आली आहे. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्टेट डेसिप्लिन कमिटीच्या सल्ल्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली