विरोधक आतापासूनच २०१९ च्या पराभवाची कारणं शोधायला लागलेत- मोदी
आमची युती ही सव्वाशे कोटी जनतेशी आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होणार हे विरोधकांनी पक्के ठाऊक आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच कारणं शोधायला सुरुवात केली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजपाच्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव आत्ताच दिसू लागला असून निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. त्यामुळेच हे लोक ईव्हीएम मशिनला खलनायक ठरवत आहेत. प्रत्येक पक्षाला जिंकावेसे वाटणे, हे अगदी नैसर्गिक आहे. मात्र, चिंतेची गोष्ट हीच आहे की, राजकीय पक्ष जनतेला गृहीत धरत आहेत. त्यांना जनता मुर्ख वाटते. त्यामुळे ते सतत रंग बदलत राहतात, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
कोलकाता येथे झालेल्या विरोधकांच्या सभेच्या व्यासपीठावर असे लोक उपस्थित होते की, एकतर ते कोणातरी प्रभावशाली व्यक्तीचे वारसदार आहेत किंवा काहींना आपल्या मुलांना राजकारणात आणायचे आहे. अशा लोकांनी एकमेकांशी युती केली आहे. मात्र, आमची युती ही सव्वाशे कोटी जनतेशी आहे, असे मोदी यांनी सांगितले.
विरोधी पक्षातील लोकांना कोणत्याही संस्थेवर विश्वास नाही. त्यामुळे ते संवैधानिक संस्थांना बदनाम करत आहेत. विरोधकांच्या सभेत कोणीतरी लोकशाही वाचविण्याचे आवाहन करत होते. मात्र, त्यांच्यातील एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य बाहेर येणारच, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.