नवी दिल्ली : भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं तणावाचं वातावरण काही केल्या शमण्याचं नाव घेत नाही आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तान सैन्यदलातील तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तान सैन्यदलाच्या माध्यम विभागाने याविषयीची माहिती देणारं पत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्याकडून राकचक्री, रावलकोट सेक्टर या भागांमध्ये नियंत्रण रेषेनजीक गोळीबार झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून देण्यात आलेला हा आकडा खरा नसल्याची माहिती भारतीय सैन्यदलाशी संबंधित सूत्रांनी दिली. पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन पाहताच भारताकडून शेजारी राष्ट्राच्या या कारवायांचं उत्तर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये पाकिस्तान सैन्यदलात झालेल्या नुकसानाचा आकडा हा मोठा असून अधिकृतपणे मात्र तीनच जवानांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आणली जात आहे. 


सोमवारी पूँछ भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बहल्ले करण्यात आल्याचं वृत्त होतं. त्याशिवाय मानकोट भागातही मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या घरांचं या गोळीबारामुळे नुकसान झालं होतं. या गोळीबारात काही स्थानिक जखमी झाले, ज्यांना राजौरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे झालेलं हे नुकसान पाहता भारतीय सैन्यदलाने कठोर पावलं उचलत नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या पाक सैन्याच्या चौक्यांवर निशाणा साधला. 


बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघ करण्याचं सत्र सुरू ठेवण्यात आलं. शिवाय नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या भागातही पाकिस्तानकडून गोळीबार करण्याचं प्रमाण वाढलं. ज्यामुळे अखेर या प्रसंगाला तोंड देण्यासाठी भारताकडून कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. शेजारी राष्ट्राकडून वारंवार केला जाणारा घुसखोरीचा प्रयत्न पाहता त्यांच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी भारताकडून नव्या स्नायपर रायफल नियंत्रण रेषेपाशी तैनात करण्यात आल्या आहेत.