जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरमध्ये भारत - पाकिस्तान सेनेदरम्यान पुन्हा एकदा चकमक झाली. भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्यूत्तर दिलं. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या (BAT) दोन एसएसजी (Special Service Group) कमांडोंना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकी दरम्यान भारतीय सेनेचा जवान रायफलमॅन सुखविंदर सिंह (२१ वर्ष) शहीद झाल्याची माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुखविंदर सिंह हे पंजाब राज्यातील होशियारपूर जिल्ह्यातील फतेहपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात मागे त्यांचे आई-वडील आहेत. 'रायफलमॅन सुखविंदर सिंह एक साहसी, प्रेरणात्मक आणि प्रामाणिक जवान होते. देश त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी आणि कर्तव्याप्रति समर्पणासाठी त्यांचा ऋणी राहील' असं म्हणत सेनेकडून त्यांना आदरांजली देण्यात आलीय.


'बॉर्डर ऍक्शन टीम' अर्थात BAT


बॅट अर्थात पाकिस्तान बॉर्डर ऍक्शन टीम आहे जी क्रूरतेसाठी ओळखली जाते. भारतीय सैनिकांच्या मृतदेहांनाही छिन्न-विछिन्न करण्याचा आरोपही बॅट कमांडोंवर अनेकदा झालाय. भारतीय शहीद हेमराज यांचं शीर कापण्याचाही आरोप बॅट कमांडोंवर करण्यात आला होता. या टीममध्ये सेनेच्या कमांडोंसोबत दहशतवाद्यांचाही समावेश असतो.


बॅट भारत - पाकिस्तान सीमेवर १-३ किलोमीटरपर्यंत हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. सीमेवर तैनात असलेले भारतीय सैन्य या टीमच्या निशाण्यावर असतात. यावेळी, पाकिस्तानी रेंजर्स त्यांना कव्हर फायरिंग देतात. पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पमध्ये बॅट कमांडोंना ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना बर्फ, पाणी, हवा, जंगल आणि मैदानात लढण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.