नवी दिल्ली : भारताकडून वारंवार मात खाऊनही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. दरवेळेस सीमाउल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानचे नवे कारस्थान समोर आले आहे. पाकिस्तानने भारतीय वायुसेनेचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा पुतळा, पाकिस्तान वायुसेनेच्या वॉर म्युझिमयमध्ये लावला आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानी सेनेच्या जवानाने, अभिनंदन यांचा एक हात पकडला असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय भाष्यकार अनवर लोधी यांनी, ट्विटरवर कराचीमधील म्युझियममध्ये लावण्यात आलेल्या पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे. एका काचेच्या पेटीत त्यांना कैद केल्याचं दिसतंय. अशाप्रकारे पुतळा लावून अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे.


यापूर्वीदेखील पाकिस्तानकडून अभिनंदन वर्थमान यांच्यावर जाहिरात करुन त्यांचा अपमान करण्यात आला होता. विश्वचषकावेळी पाकिस्तानकडून अभिनंदन यांच्यावर जाहिरात तयार करण्यात आली होती. त्या जाहिरातीचा भारतीयांकडून चांगलाच विरोध करण्यात आला होता. 



  


२७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी भारतीय वायदूलाच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. यामध्ये अभिनंदन वर्थमान यांनी आपल्या मिग-२१ या विमानाच्या साहाय्याने मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांनी आपल्या मिग-२१ विमानाने अद्ययावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ विमानाला धूळ चारली होती. 


यानंतर अभिनंदन वर्थमान यांचे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. मात्र, अभिनंदन यांनी तेव्हाही अत्यंत धैर्याने परिस्थितीचा सामना केला होता.