नवी दिल्ली: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी झालेल्या एकदिवसीय सामना चांगलाच चर्चेत आहे. या सामन्यात पाकिस्तानाने न्यूझीलंडवर सहा गडी राखून विजय मिळवला. मात्र, त्यांच्या या विजयाला इमाम उल हक जायबंदी झाल्यामुळे गालबोट लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमाम उल हक १६ धावांवर खेळत असताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन याचा चेंडू त्याच्या हेल्मेटवर जोरात आदळला. सुदैवाने हेल्मेटच्या जाळीमुळे चेंडू इमामच्या थेट तोंडावर लागला नाही. मात्र, चेंडूचा वेग इतका होता की इमामला जोरदार झटका बसला. 


त्यामुळे इमाम थेट जमिनीवर कोसळला. तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. सर्व खेळाडू इमामभोवती जमले तेव्हा त्याचे डोळे बंद होते, परंतु तो शुद्धीत होता. अखेर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. 


सुदैवाने इमामला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या संघाचे फिजिओ त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत. लवकरच तो मैदानात उतरेल, असे ट्विट पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केले.