Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
भारतीय न्यायालयाने आजच निकाल जाहीर का केला? पाकिस्तानचा सवाल
इस्लामाबाद : अयोध्या राजमन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकालाची घोषणा केली. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारतावर टीका केली. भारतीय न्यायालयाने घेतलेला हा निर्णय आधीपासूनच दबलेल्या मुस्लिम समुदायावर अधिक दबाव टाकेल, असे कुरेशी यांनी म्हटले.
या निर्णयाचा तपशील वाचल्यानंतर पाकिस्तानकडून यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच हा निकाल जाणूनबुजून ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्धाटनावेळी जाहीर करण्यात आल्याचा आरोपही कुरेशी यांनी केला.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या कालावधीनंतर शनिवारी निर्णय जाहीर केला. भारतीय न्यायालयाने आजच निकाल जाहीर का केला, असा सवालही कुरेशी यांनी केला. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनीही निकालाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कुरेशी यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या अंतर्गत नागरी प्रश्नासंदर्भात पाकिस्तानने व्यक्त केलेली अनावश्यक प्रतिक्रिया आम्ही नाकारत असून या प्रतिक्रिया निंदनीय असल्याचे म्हणत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले.