`दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखला होता`
शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि स्फोटकेही लष्कराच्या हाती लागली आहेत.
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत याबद्दल खुलासा केला. लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लोन, पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक झुल्फिकार हसन यांनी संयुक्तपणे ही पत्रकारपरिषद घेतली.
यावेळी के.जे.एस. धिल्लोन यांनी म्हटले की, दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. याशिवाय, पाकिस्तानी शिक्का असलेले भूसुरुंगही लष्कराच्या हाती लागले आहेत. याची काही छायाचित्रे पत्रकारपरिषदेत सादर करण्यात आली. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरु आहे.
आतापर्यंतच्या शोध मोहीमेत पोलिसांना दहशतवाद्यांचा सुगावा लागला आहे. याशिवाय, शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि स्फोटकेही लष्कराच्या हाती लागली. आम्ही आतापर्यंत कटात सामील असलेल्या बहुतांश बड्या सूत्रधारांना पकडले आहे. मात्र, अजूनही शोध मोहीम सुरु असल्याचे धिल्लोन यांनी सांगितले.
पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लोन यांनी म्हटले.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच काश्मीर खोऱ्यात १० हजार जवान पाठवून येथील सुरक्षा आणखी कडेकोट केली होती. यामध्ये सीआरपीएफच्या ३० कंपनी, सीमा सुरक्षा दलाच्या १० आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या १० कंपन्यांचा समावेश आहे.