अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर चीनच्या मदतीने पाकिस्तानची नवी चाल
चीनने अद्याप याविषयी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावरून परतले आहे. त्यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकारपरिषेदत भारताविरोधात पुन्हा एकदा राग आळवला.
आम्ही जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागणार आहोत. यासाठी चीनचाही आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा कुरेशी यांनी केला. मात्र, चीनने अद्याप याविषयी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान आणि चीनने आतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भारताची अडवणूक केली आहे. चीनने कायम पाकिस्तानची तळी उचलून धरल्यामुळे अनेक वर्षांपासून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव अडकून पडला होता. मात्र, अखेर भारताच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीपुढे नमते घेत चीनला नाईलाजाने या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चर्चेअंती हा प्रस्ताव मंजूर झाला होता. यानंतर मंगळवारी लोकसभेतही भाजपने या प्रस्तावाला मंजूरी मिळवून घेण्याची औपचारिकता पूर्ण केली होती.
दरम्यान, अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसक निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारकडून खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजसाठी येथील संचारबंदी अंशत: शिथील करण्यात आली होती. त्यावेळी काश्मीरमधील वातावरण सामान्य होते. त्यामुळे शनिवारपासून काश्मीरमधील संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे.
यामुळे काश्मीरमधील शाळा-महाविद्यालये आणि इतर दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु झाले आहेत. दरम्यान, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.