श्रीनगर : जम्मू - काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेशेवर पुन्हा गोळीबार सुरू झालाय. अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने पहाटे तीन वाजल्यापासून जोरदार गोळीबार केला. उखळी तोफा आणि छोट्या शस्त्रांचा सातत्याने मारा सुरू होता. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. सीमेवर दोन्ही बाजूंनी पहाटे साडे सहापर्यंत गोळीबार सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार थंडावला होता. पण आज पहाटे पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू करून शांतता धोक्यात आणलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'एअर स्ट्राईक'नंतर रविवारी पहिल्यांदाच समझौता एक्सप्रेस दिल्लीहून अटारीसाठी रवाना झाली. यापूर्वी, भारतीय वायुसेनेनं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननं आपल्या बाजूनं ही रेल्वेसेवा रद्द केली होती. त्यानंतर भारतानंही २८ फेब्रुवारी समझौता एक्सप्रेस ट्रेन रद्द केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अटारीसाठी रवाना झालेल्या समझौता एक्सप्रेसमध्ये केवळ १२ पाकिस्तानी प्रवाशांनी तिकीट बूक केलं होतं. हे सर्व दिल्लीहून अटारीसाठी रवाना झाले. रेल्वे सुरक्षा दलाचे इन्स्पेक्टर मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व १२ प्रवासी पाकिस्तानचे नागरिक आहेत. या प्रत्येक नागरिकाचं सामान डॉग स्क्वॉडद्वारे तपासण्यात आलं. 


समझौता एक्सप्रेस प्रत्येक बुधवारी आणि रविवारी दिल्लीहून अटारीसाठी रवाना होते. २२ जुलै १९७६ रोजी अटारी-लाहोर दरम्यान या रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती.