एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार
पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून कुरापती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. पाकिस्तानने एकीकडे भारतीय वैमानिक अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि दहशतवाद्यांचा हल्ला सुरुच आहे. एकंदीरत एकीकडे अभिनंदनची सुटका करताना दुसरीकडे भारतीय सीमेवर हल्ला आणि गोळीबार अशी पाकिस्तानची दुहेरी भूमिका सुरुच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काश्मीरमधल्या हंडवाडामध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताचे ४ जवान शहीद झाले आणि ८ जवान जखमी झाले. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याला भारतानं तोडीस तोड प्रत्युत्तर देताना २ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर आज चकमक झाली. या परिसरात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुपवाडाच्या बाबागुंड भागाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे चकमक सुरू झाली. यावेळी घर कोसळले. ढिगाऱ्यात दहशतवादी गाढले गेले. मात्र, भारतीय जवान जवळ जाताच दहशतवाद्यांनी उठून गोळीबार केला. या चकमकीदरम्यान चार जवानांना वीरमरण आले. तसेच चकमकीच्या जागी जमलेल्या तरुणांचा सुरक्षा दलांबरोबर संघर्ष होऊन त्यात चार जण जखमी झाले.
पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचे पुढे आले आहे. तरीही आमच्या देशात दहशतवादी नाहीत असे पाककडून सांगण्यात येत आहे. मात्र, याची पोलखोल झाली आहे. मसूद अजहर पाकिस्तानमध्येच असल्याची कबुली खु्द्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी दिलीय. त्यांनी एका परदेशी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलंय. मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे.