श्रीनगर : भारतीय सेनेकडून सडेतोड उत्तर मिळूनही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेच. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. शुक्रवारी नियंत्रणरेषेजवळच्या उरी भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून उत्तर काश्मीरच्या उरी कमलकोट भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या शस्त्रसंधी उल्लंघनात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीतील कमलकोट सेक्टरमधील गौहालन, चोकस, किकर आणि ताठी चौक्यांजवळ हे उल्लंघन करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तान सेनेकडून या भागात पहाटे ३च्या सुमारास मोठा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कुरापती जगजाहीर असून त्यांच्याकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. ज्याला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येते आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुंड गावात रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुला जिल्ह्यातल्या कमालकोट भागातील गावांच्या परिसरात पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी संध्याकाळी अचानक भारतीय चौक्यांवर तसेच गावांवर गोळीबार करायला सुरुवात केली. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारताकडून लगेचच जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. रात्रभर हा गोळीबार सुरूच होता. यात एक जण जखमी झाला. 


जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. हा तणाव असतानाच पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.