मुंबई : देशांतर्गत तणावांमुळे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तान सीमेवर भारताच्या कुरापती करू शकतो, अशी शक्यता ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. गॅससह अनेक गोष्टींची टंचाई आहे. ११ विरोधी पक्षांनी ३१ जानेवारीपर्यंत इम्रान खान यांना राजीनाम्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान नेहमीचीच भारतविरोधाची चाल खेळू शकतो, अशी शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकव्याप्त काश्मीरमधील लाँच पॅडवर २०० ते आडीचशे अतिरेकी भारतात घुसखोरीसाठी तयार असल्याचं लष्कराच्या फिफ्टिन कॉर्प दलाचे प्रमुख लेफ्ट जन बी एस राजू यांनी म्हटलं आहे. मात्र ही घुसखोरी रोखण्यासाठी आपलं लष्कर सज्ज असल्याचंही ते म्हणाले.


पाकिस्तानकडून राजस्थान आणि गुजरातमधून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न होऊ शकते. अशी देखील शक्यता आहे. यावर्षी पाकिस्तानकडून नवीन मार्गांद्वारे या दोन्ही राज्यात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.


सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानकडून राजस्थान आणि गुजरातमध्ये 2020 मध्ये घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. विशेष बाब म्हणजे या काळात काश्मीरमध्ये केवळ एकाच घुसखोरीच्या प्रयत्नांची नोंद झाली होती, तर गेल्या वर्षी असे चार प्रयत्न रेकॉर्डवर नोंदविण्यात आले होते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये घुसखोरीची नोंद झाली.


बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तान दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नवीन मार्ग शोधत आहे, परंतु आमच्या सैनिकांच्या चोवीस तास तत्परतेमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. यावर्षी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये घुसखोरीची एकूण 11 प्रकरणे नोंदवली गेली.