वाराणसी : मिलिटरी अधिसूचना आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एका पाकिस्तानी आयएसआय एजंटला अटक केली आहे. हा एजंट काही महत्त्वाची माहिती फोटोद्वारे पाकिस्तानात पाठवत असल्याचा आरोप आहे. संयुक्तपणे झालेल्या या कारवाईत या एजंटला वाराणसीमधून पकडण्यात आलं आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव रशीद अहमद असून तो चंदौलीचा राहणारा आहे आणि दोनदा पाकिस्तानात जाऊन आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशीद अहमद असं या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. तो चंदौली जिल्ह्यातील चौरहटचा राहणारा आहे. राशिद २०१८ मध्ये कराचीला त्याच्या मावशीकडे गेला होता. त्यानंतर तो तेथे आयएसआयच्या संपर्कात आला. मार्च २०१९ पासून तो पैशांच्या मोबदल्यात देशातील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि सैन्याच्या ठिकाणांचे फोटो आयएसआयला पाठवत होता. यासाठी आयएसआय त्याला पैसे आणि गिफ्ट पाठवत होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून त्याला अटक केल्याने गुप्तचर यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. एटीएसच्य़ा माहितीनुसार, रशीदची चौकशी सुरु असून भारतातील कोणत्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती तो पाकिस्तानला पाठवत होता याची माहिती घेतली जात आहे. या शिवाय पाकिस्तान कोणत्या माध्यमातून त्याला पैसे आणि गिफ्ट पाठवत होता याची देखील माहिती घेतली जात आहे. त्याच्या मोबाईलची देखील माहिती काढली जात आहे.