नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा झालेल्या राम रहिमच्या संपत्तीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्याच्याकडे १८ जिल्ह्यांमध्ये १०९३ एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत ११५१ कोटी रूपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात आणखी काही डे-याच्या जमिनीवरील इमारतींची माहिती घेतली गेली नाही. हा अहवाल कोर्टाच्या आदेशानंतर अधिका-यांनी तयार केला आहे. पंचकुलामध्ये हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई राम रहिम करेल, असा आदेश कोर्टाने दिला होता. त्यानंतर त्याच्या संपत्तीची माहिती मागवण्यात आली होती.  


राम रहिमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर ही हिंसा उसळली होती. यात झालेल्या नुकसानाचाही अहवाल तयार करण्यात आला आहे. यात सेना, अर्धसैनिक दल, रोडवेज आणि रेल्वेचे झालेले नुकसान जोडण्यात आले आहे. या हिंसेत एकूण २०४ कोटींचं नुकसान झालं आहे. ही नुकसान भरपाई बाबाच्या संपत्तीतून वसूल केली जाईल. या हिंसेत झालेल्या नुकसानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. कारण सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाची माहिती मागवली आहे. 


कशाचे किती नुकसान?


- रोडवेज - १४ कोटी
- उत्तर रेल्वे - ५० कोटी
- सेना आणि अर्धसैनिक दल - ४५ कोटी
- प्रदेशातील हिंसेमुळे - ९५ कोटी


११५१ कोटींच्या संपत्तीमध्ये राम रहिमकडे सर्वात जास्त जमीन सिरसामध्ये आहे. सिरसा जिल्ह्यातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची जमीन तब्बल ९५३ एकर आहे. या जमिनीची किंमत १ हजार कोटी आहे. या जमिनीवर राम रहिमची गुफा, डेरा शिक्षण संस्था, डेरा सत्संग स्थळ, मीडिया सेंटर, फॅक्टरी, गार्डन, रेस्टॉरंट, सिनेमागृह, रूग्णालये, शाही मुलींसाठी आश्रम आणि बाबाच्या परिवारासाठी असलेला आलिशान महल आहे. 


यासोबतच हिसारमध्येही राम रहिमची ८ कोटींची जमीन आहे. जिंदमध्ये एकूण ६ डेरे आहेत. ज्यातील ४ राम रहिमच्या नावावर आहेत. या जिल्ह्यात डे-याची एकूण संपत्ती १९ कोटी ३३ लाख रूपये आहे. कॅथलमध्ये डेरा प्रमुखाची १२.५ कोटींची संपत्ती आहे. यात कॅथलचा जुना डेरा आणि इमारत ३ कोटी ६५ लाख, नवीन डेरा आणि इमारत पाच कोटी ६१ लाख रूपये यांचा समावेश आहे.