गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणी जिल्ह्यातील मरडसगाव इथल्या तुकाराम वैजनाथ काळे यांच्या मृत्यूमुळे अख्खं कुटुंब उघड्यावर पडलंय. एक एकर शेती आणि पत्र्याचं हे फुटकं घर एवढीच काय ती तुकाराम काळे यांची संपत्ती म्हणता येईल.१४ वर्षाची करूणा, १० वर्षाचा किशोर यांचं पितृछत्र हरपलंय. बायको दोन्ही कानांनी कर्णबधीर असल्याने त्यांच्या दोन्ही कानाच्या ऑपरेशनसाठी काळे यांनी खाजगी कर्ज उचललं होतं. त्यामुळे पाथरी इथल्या स्टेट बँकेकडे कर्ज मिळावं म्हणून चार महिन्यापासून काळे पाठपुरावा करत होते.


बॅंकेसमोर उपोषण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा पाठपुरावा करूनही कर्ज मिळत नसल्याने काळे यांनी १२ डिसेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बँक अधिकाऱ्यांनी ४० हजार कर्जाऐवजी केवळ वीस हजार रुपयांच कर्ज तुकाराम काळे यांना मिळेल अस स्पष्ट केलं. यामुळे काळे यांना धक्का बसला आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला.


मृतदेह बॅंकेच्या दारात 


काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह सात तास बँकेच्या दारात ठेवला गेला. त्याची दखल घेतली जावी म्हणून शेतकऱ्यांना रास्तारोको, ठिय्या आंदोलन करावे लागले. टीका होईपर्यंत प्रशासन दखलही घेत नाही हे या घटनेतील दुर्दैव म्हणावे लागेल.


मुजोरांवर कारवाई 


हात पाय जोडून आणि आवश्यक ते कागदपत्रं जोडूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. डिसेंबरला उजाडला तरी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मुजोर बँक अधिकारी आणि प्रशासनावर कारवाई होण्याची गरज व्यक्त होतेय.